- ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
‘रन फॉर हेल्थ ॲण्ड बिल्ड द नेशन’ हे ब्रीद वाक्य घेऊन गेल्या १४ वर्षांपासून राज्यस्तरावर तर ९ वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन’ या स्पर्धेला देशभरातील खेळाडूंकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता यंदा ही स्पर्धा आजवरचे सर्व विक्रम मोडणार असल्याचा असा विश्वास मविप्रचे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला. रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२६’ या स्पर्धेसंदर्भात माहिती देण्यासाठी मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, अमित बोरसे, विजय पगार आदींसह शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, प्रा. डी. डी. जाधव, प्रा. शशिकांत मोगल, प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे, क्रीडा अधिकारी प्रा. डॉ. मीनाक्षी गवळी, प्रा. हेमंत पाटील यांच्यासह विविध समित्यांचे प्रमुख, सदस्य आणि क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
यावेळी ॲड. ठाकरे यांनी सांगितले कि, ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२६’ च्या शुभारंभाची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यंदाची मविप्र मॅरेथॉन ही १० वी राष्ट्रीय व १५ वी राज्यस्तरीय स्पर्धा असून, रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजता गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौक येथून स्पर्धा सुरू होईल. गंगापूर रोडमार्गे धोंडेगावपर्यंत आणि तिथून पुन्हा मॅरेथॉन चौक येथे समारोप, असा स्पर्धेचा मार्ग असेल. प्रमुख अतिथी म्हणून ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांची उपस्थिती असेल. तसेच, स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी विविध शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असेल.
४ हजाराहून अधिक स्पर्धकांची नोंदणी
या स्पर्धेसाठी ६ जानेवारी दुपारी २ वाजेपर्यंत ४, ०२० स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. वाढता प्रतिसाद लक्षात घेता दि. ५ वरून दि. ७ जानेवारीपर्यंत नोंदणीची मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती आयोजन समितीने दिली.
विजेत्यांना साडे आठ लाखांची बक्षीसे
या स्पर्धेसाठी यंदा बक्षिसांच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. पाच हजार रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंत अशी एकूण आठ लाख ५८ हजार रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. फूल मॅरेथॉन (४२.१९५ किमी) साठी एकूण ११ विजेत्यांना अनुक्रमे एक लाख ५१ हजारांपासून ते ११ हजारांपर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. हाफ मॅरेथॉन (२१.०९७ किमी)साठी एकूण ९ विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजारांपासून ते ३ हजारांपर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. महिला व पुरुष १० किमी खुल्या गटातील स्पर्धेसाठी प्रत्येकी ९ अशा १८ स्पर्धकांना ११ हजारांपासून ते १ हजारापर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. १४, १७, १९ आणि २५ वर्षांआतील मुले आणि मुलींच्या खुल्या स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटात सहा स्पर्धक निवडण्यात येणार असून, यामध्ये पाच हजारांपासून ते एक हजारापर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी ॲड. ठाकरे यांनी दिली.
Comments are closed.