नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
अवघ्या नाशिककरांसाठी अभिमानास्पद ठरेल असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नाशिक शहराला क्लिन स्ट्रिट फूड हब’ अशी नवीन ओळख मिळणार आहे. केंद्र सरकारने फूड हबसाठी नाशिकसह राज्यातील तीन इतर शहरांची निवड करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने देशातील शंभर शहरांची फुड हब या उपक्रमासाठी निवड केली असून महाराष्ट्रात नाशिकसह कोल्हापूर व नांदेड या तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक शहरात मनपा तीन ठिकाणी फूड हब विकसित करणार असून एका हबसाठी केंद्र सरकार महापालिकेला एक कोटींचा निधी देणार आहे. लवकरच या योजनेवर काम सुरु करावे, अशा सूचना केंद्राने पत्राद्वारे महापालिकेला दिल्या आहेत.
अशी आहे केंद्राची संकल्पना..
‘क्लिन स्ट्रिट फूड हब’ म्हणजे काय तर शहरातील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे व सार्वजनिक गजबजलेले स्पाॅट अशा ठिकाणी महापालिकेकडून फूड हब उभारले जातील. त्या ठिकाणी आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, प्रसाधन गृह, खवय्यांसाठी पार्किंग, आकर्षक विद्युत योजना, साठवण जागा असणे अनिवार्य असणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून एक कोटींचा निधी दिला जाईल. त्यासाठी केंद्र व राज्य 60 : 40 खर्च उचलेल. या फूड हबचे व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणार्या व अनुभव असणार्या एनजीओ मार्फत केले जाईल. तसेच या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणार्या स्टाॅलधारकांना अन्न सुरक्षा व स्वच्छता यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. नाशिक महापालिका असे तीन फूड हब विकसित करणार असून त्यासाठी गोदाघाट, गंगापूर रोड, तपोवन यासंह काही महत्वाच्या ठिकाणांचा प्रस्तावावर विचार करत आहे.
आगामी सिंहस्थापूर्वी फूड हब विकसित केले जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून भाविक, पर्यटक नाशिकला भेट देणार आहेत. त्यांना नाशिकच्या या खाद्य पदार्थाची चव फूडहबमध्ये चाखता येईल. त्यामाध्यमातून जगभरात नाशिकच्या खाद्यपदार्थांची ब्रॅण्डिंग जगभरात होण्यास मदत होईल.