नाशिक/एनजीएन नेटवर्क
तक्रारदाराकडून तब्बल १५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाशिक तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्यावर आहेर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बहिरम यांच्या निलंबनाचे आदेश काढत महसूल सप्ताहात वसुली करणाऱ्या अधिकाऱ्याला चपराक दिली आहे.
संशयित तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी १५ लाखांची लाच घेतल्याचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही त्याची गंभीर दखल घेतली आहे. सदर घटनेमुळे महसूल विभागासोबत जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्याच अनुषंगाने बहिरम यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बहिरम यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविना मुख्यालय न सोडण्याचेही निलंबन आदेशात म्हटले आहे. नाशिक तहसील कार्यालयाच्या एकूणच तक्रारींबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुन्डावरे यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यालयीन तपासणी पथक नेमले आहे. हे पथक येत्या दोन-तीन दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सदर करण्याची शक्यता आहे.