६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कामगिरी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकची नेमबाज अंजली भागवत हिने उल्लेखनीय यश मिळवत सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय पदक पटकावले आहे. भिष्मराज बाम मेमोरियल शूटिंग रेंजची नेमबाज असलेल्या अंजलीने सातत्यपूर्ण कामगिरीतून आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली.
अंजली सध्या आर्मी गर्ल्स कंपनी, महू (मध्यप्रदेश) येथे सराव करत आहे. आर्मी गर्ल्स संघाकडून खेळताना तिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात कनिष्ठ गटात सांघिक सुवर्णपदक, तर वरिष्ठ गटात सांघिक रौप्यपदक जिंकले.
६८ वी राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा ११ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत दिल्ली येथे सुरू आहे. या स्पर्धेत अंजलीच्या यशामुळे नाशिकच्या क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
याचबरोबर, २ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या एशियन रायफल अँड पिस्तूल चॅम्पियनशिप २०२६ साठी अंजली भागवतची कनिष्ठ गटात भारतीय संघात निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने तिच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
अंजलीच्या या यशाबद्दल कुटुंबीय, प्रशिक्षक तसेच क्रीडा क्षेत्रातून तिचे अभिनंदन होत आहे.
Comments are closed.