नाशिक/एनजीएन नेटवर्क
गणेश विसर्जन मिरवणुक तसेच ईद-ए-मिलादच्या जुलूसमध्ये डीजे वाजविण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी असतानाही आयोजकांनी डीजेचा दणदणाट केल्यामुळे शहरात संबंधितांविरोधात पोलीसात गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी लवकरच पोलिसांकडून डीजेंवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
गेल्या गुरुवार आणि शुक्रवारी अनुक्रमे गणेश विसर्जन मिरवणुक आणि ईद-ए-मिलाद जुलूस निघाले होते. दोन्ही प्रकारांत डीजे न वाजविण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले होते. पोलिसांच्या आवाहनाला गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु प्रत्यक्षात विसर्जन मिरवणुकीतील सहा मंडळांनी डीजे वाजविला. त्यामुळे याप्रकरणी भद्रकाली पोलिसात पाच तर नाशिकरोड पोलिसात एक असे सहा मंडळांविरोधात मनाई आदेशाचा भंग तसेच, पर्यावरण संरक्षण कायदा व ध्वनीप्रदूषण नियमन व नियंत्रणअन्वये गुन्हा दाखल करण्यात आले . गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलादनिमित्ताने काढण्यात आलेल्या जुलूस मिरवणूकीतही डीजेचा दणदणाट करण्यात आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यांकडून या गुन्ह्यांची माहिती सहायक पोलीस आयुक्तांना दिली आहे. त्यानुसार सहायक आयुक्तांकडून चौकशी सुरू करण्यात आलेली असून, लवकरच गुन्हे दाखल करण्यात आलेेल्या डीजेचालकांचे डीजे साहित्य पोलिसांकडून जप्त केले जाणार आहेत. तसेच, ज्या गणेश मंडळांनी डीजे वाजविल्या त्या मंडळांच्या अध्यक्षांवरही कारवाई केली जाणार आहे.