नाशिक/एनजीएन नेटवर्क
दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्जन्यराजाने आतापर्यंत असंतुलित न्याय दिला आहे. काही तालुक्यांत समाधानकारक पाऊस झालेला असला तरी अनेक तालुके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी आतापर्यंत २२३.८ मिलीमीटर म्हणजे केवळ ६३.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तुलनेत गत वर्षी याच काळात पावसाचे प्रमाण ५७७.१ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत दुपटीहून होते. यंदा नाशिकसह सिन्नर, नांदगाव, चांदवडसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत या तालुक्यांत सरासरी निम्म्याच्या आसपास पावसाची नोंद आहे.
हवामान विभागाने १९ ते २२ जुलै या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही रिमझिम सरींव्यतिरिक्त पाऊस होत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे. यंदा अनेक भागात पाऊस हुलकावणी देत आहे. दमदार पावसाअभावी पेरण्यांना विलंब होत आहे. बुधवारपासून पुष्य नक्षत्राला प्रारंभ होत आहे. या नक्षत्रात तरी दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.