पुणे/एनजीएन नेटवर्क
येथील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेनंतर महाविद्यालयात खळबळ माजली आहे. आत्महत्या करणारा हा विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात बी. एस्सी. च्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षात शिकत होता आणि तो मूळ नाशिकचा असल्याची माहिती पुढे आली आहे.
ओम कापडणे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो अवघ्या 20 वर्षांचा होता. वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात ओमने गुरुवारी गळफास घेतला. ही माहिती मिळताच हेल्परायडर्स संघटनेचे पंकज घरडे आणि अभिजित मेश्राम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ओम याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ओम मूळचा नाशिक येथील आहे. तो विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबद्दल त्याचे महाविद्यालय आणि जवळच्या मित्रांकडे चौकशी केली जात आहे. घटनास्थळी चिठ्ठी आढळून आलेली नाही. ओमने हे पाऊल का उचलले, याचा तपास सुरू आहे, असे चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी सांगितले.