डेट्रोईटच्या भारतीयांसाठी गणेशोत्सवातील देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अमेरिकेतील भारतीय , विशेषतः महाराष्ट्रीय मंडळी गणेशोत्सव साजरा करण्यात किंचितही मागे नाहीत . तेथील विविध राज्यात अभिनव कार्यक्रमांद्वारा श्री गणेशाचे भक्ती व जल्लोषात पूजन केले जात आहे. यात घरगुती गणपती प्रतिष्ठापनेतून सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक देखाव्यांच्या सादरीकरणाला प्राधान्य दिले आहे . मूळच्या नाशिकच्या प्रणव आणि ऋतुजा औंधकर या जोडीने डेट्रोईटमधील स्वतः च्या घरात आठ बाय दहा फुटांच्या भव्य मंचावर उभारलेला पावनखिंडीचा प्रसंग हा डेट्रोईटच्या भारतीयांसाठी कौतुकाचे व आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
देखाव्यासाठी बरेचसे साहित्य भारतातून मागवण्यापासून ते तोफा , तलवारी , भाले, पालखी शिवमुद्रा यासारख्या वस्तू स्वतः डिझाईन करून थ्री डी प्रिंटरवर तयार करण्यासाठी ही जोडी तब्बल दोन महिन्यांपासून झटत होती . आठ मिनिटांच्या भारदस्त ऑडिओला साजेसे असे नेपथ्य तयार करण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले . छत्रपती शिवरायांच्या राजकीय मुत्सुद्देगिरीपासून ते प्रसंगी जीवाची बाजी लावणारे बाजीप्रभू व शिवा काशीद सारख्या लढवय्याची कामगिरी अधोरेखित करणाऱ्या दृकश्राव्य सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली .
याशिवाय १९७६ पासून सातत्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मराठी मंडळ ऑफ डेट्रॉईटने देखील आपल्या ढोलपथकाच्या वॆशिष्ट्यपूर्ण वादनातून विविध ठिकाणच्या गणेशांना मानवंदना दिली आहे . सत्तर हुन अधिक वादकांचा समावेश असणाऱ्या मंडळाच्या या ढोलपथकाचे नेतृत्वदेखील प्रणव ऋतुजा ही नाशिककर जोडी करत आहे . नुकतेच या पथकाने ट्रॉय येथील भारतीय मंदिर, लिव्होनिया चे साईबाबा मंदिर , शिर्डी साई सोसायटी ट्रस्ट रोशेस्टर हिल्स या ठिकाणी बहारदार वादन करून उपस्थितांची मने जिंकली . दरम्यान अजून वेन स्टेट युनिव्हर्सिटी , मिशिगन युनिव्हर्सिटी येथील सादरीकरण बाकी असून १३ सप्टेंबर रोजी मराठी मंडळाच्या गणेशोत्सवातील सहभागाने उपक्रमांची सांगता होणार आहे. या वाटचालीत सतत सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या मराठी मंडळाच्या अध्यक्षा वर्षा पाथरे तसेच साईनाथ जाधव , आदित्य ढवळे, आरती कोथमाळे, अंकिता वाळुंजकर, सुरेखा पोकळे आदी उत्साही सहकाऱ्यांमुळे हे सर्व शक्य होते असा कृतज्ञतापूर्ण उल्लेख प्रणव औंधकर आवर्जून करतो .
Comments are closed.