नाशिक/एनजीएन नेटवर्क
पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस(PBP) या नामांकित स्पर्धेत नाशिकच्या सायकलपटूंनी रोवला भारताचा झेंडा रोवला आहे. नाशिकचे आठ सायकलिस्टस् या स्पर्धेत सहभागी झालेत.
फ्रान्समधील पॅरिस येथे 20 ते 24ऑगस्ट दरम्यान जागतिक पातळीवर पार पडलेल्या पॅरिस- ब्रेस्ट- पॅरिस (PBP) -2023, रॅन्डोनिअर ह्या स्वयं-आधारित 1220 कि. मी. ब्रेव्हेट स्पर्धैत जगभरातून 8000 तर भारतातून 280 सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होते. त्यामध्ये नाशिकच्या आठ सायकलिस्टस्नी सहभाग नोंदवला. 1220 किलोमीटरची सायकल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 90 तासाचा कालावधी दिला जातो. नाशिकचा अल्ट्रा- सायकलपटू विभव शिंदे याने केवळ 67 तास 51 मि. व 06 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली व भारत देशातून चौथा तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. भगूर येथील रहिवासी गणेश कुंवर या अल्ट्रासायकलिस्टने 73 तास 46 मि. 33 सेकंदात स्पर्धा पूर्ण करून भारतातून बारावे स्थान पटकविले. नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन किशोर काळे यांनी 87 तास 20 मिनिट 20 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. नाशिकचे रेडिओलॉजिस्ट डॉ. राहुल सोनवणी यांनी 87 तास 59 मि. 32 सेकंदात ही स्पर्धा यशस्वी पूर्ण केली.संगमनेर येथील रहिवासी विजय काळे यांनी 88 तास 12मिनिट41 सेकंदात पूर्ण केली. आयर्न मॅन निलेश झवर यांनी शेवटपर्यंत झुंज देऊन फिनिश लाईन निर्धारित वेळेच्या काही तास उशिरा पूर्ण केली. या स्पर्धेत नाशिकच्या महिला सायकलिस्ट डॉ. अनिता लभडे यांनी 1017 कि.मी.अंतर पूर्ण केले . मानेचा प्रचंड त्रास होत असल्यामुळे ही स्पर्धा थोड्या अंतरासाठी सोडावी लागली. आयर्न मॅन नीता नारंग यांनी ब्रेस्ट पर्यंतचे अर्धे अंतर पार करून पुढच्या चेक पॉइंटला पोहोचल्या त्यानंतर गुडघ्याची सूज वाढली व वेदना सहन न झाल्याने ही स्पर्धा सोडावी लागली.
या अष्टपैलू सायकलपटूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले व भारताचा तिरंगा पॅरिसमध्ये अभिमानाने फडकविला. त्याबद्दल नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी एकच जल्लोष केला. तसेच हा आनंद वात्सल्य वृद्धाश्रम येथील विशेष आजी बाबा सोबत केक कापून व मिठाई वाटप करुन साजरा केला.