- प्रो – कबड्डी धर्तीवर फ्लड लाइट प्रकाशात रंगणार थरार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे नाशिकमध्ये प्रो कबड्डीच्या धर्तीवर जिल्हास्तरीय ‘कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा दि. २६ ते २७ डिसेंबर असे दोन दिवस केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहेत. शुक्रवार दि.२६ रोजी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर राहणार आहेत, अशी माहिती मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर स्पर्धा १७ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी नॉक आउट व लिग पद्धतीने व प्रो-कबड्डीच्या नियमांप्रमाणे खेळविल्या जाणार आहेत. दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी केंद्रपातळीवर जिल्हाभरातील एकूण १६ केंद्रांवर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकूण १६ केंद्रांवर प्रत्येकी २६ संघ सहभागी झाले होते. अशा एकूण ४१६ संघांनी (मुले व मुली) म्हणजेच तब्बल ५ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सहभाग नोंदवला होता. यापैकी विजय मिळविलेले मुले आणि मुलींचे प्रत्येकी १६ असे ३२ विजयी संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमधील अंगभूत कौशल्यांना वाव मिळणार असून, यातूनच उद्याचे राष्ट्रीय खेळाडू तयार होणार असल्याचा विश्वास सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, शशिकांत मोगल, केटीएचएम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे तसेच सर्व समित्यांचे प्रमुख व क्रिडा संचालक, शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते.
अशी असतील बक्षीसे…
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मुले आणि मुली अशा दोन्ही संघांना प्रत्येकी ३१ हजार रुपये रोख, कर्मवीर चषक, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या मुले आणि मुली अशा दोन्ही संघांना प्रत्येकी २१ हजार रुपये रोख, कर्मवीर चषक, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या मुले आणि मुली अशा दोन्ही संघांना प्रत्येकी ११ हजार रुपये रोख, कर्मवीर चषक अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. याबरोबरच स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूस मान्यवरांच्या हस्ते ‘बेस्ट प्लेयर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
लाइव्ह प्रक्षेपणाद्वारे सामन्यांचा थरार
खेळाडूंना प्रो कबड्डीच्या धर्तीवर क्रमांकानुसार आकर्षक रंगीत गणवेश, शूज असे संपूर्ण किट देणार असून, या सामन्यांचा एक वेगळा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. तसेच, या स्पर्धेचे सोशल मिडियावर लाइव्ह प्रक्षेपण देखील केले जाणार असल्याने क्रीडाप्रेमींना घरबसल्या या स्पर्धांचा आनंद घेता येणार आहे.
विविध समित्यांची स्थापना
स्पर्धेसाठी पदाधिकारी, सर्व संचालक आणि शिक्षणाधिकारी यांची सुकाणू समिती, स्वागत, मैदान, तांत्रिक आणि आयोजन अशा महत्वाच्या समित्यांची स्थापना करण्यात आली असून, स्पर्धेचे यशस्वी नियोजन या माध्यमातून करण्यासाठी सर्व समित्या सज्ज आहेत.
पुरस्कारप्राप्त शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडूंचा सत्कार
समारोपप्रसंगी नाशिकमधील प्रो-कबड्डी खेळाडू तसेच, आशियाई कबड्डी स्पर्धा सुवर्णपदक विजेता आकाश शिंदे (शिवछत्रपती पुरस्कार) क्रीडा शिक्षक संजय होळकर (शिवछत्रपती पुरस्कार), इराणच्या कबड्डी कोच शैलजा जैन (जिजाऊ पुरस्कार,) खेळाडू भक्ती कुलकर्णी (कबड्डी, शिवछत्रपती पुरस्कार), खेळाडू निर्मला भोई (शिवछत्रपती पुरस्कार) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.
Comments are closed.