- ठरावाला सभासदांनी विरोध करून तो नामंजूर केल्याचा प्रतिदावा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मविप्र समाज संस्थेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘मविप्र विद्यापीठ’ स्थापनेच्या प्रस्तावास आवाजी बहुमताने सभासदांनी मंजुरी दिल्याचा दावा सत्ताधारी गटाकडून केला जात असतानाच संस्थाध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी मात्र वस्तूस्थिती वेगळीच असल्याचे स्पष्ट केले आहे. बैठकीत कार्यक्रम पत्रिकेतील सात विषयांना मंजुरी देण्यात आली असली तरी आठव्या विद्यापीठ स्थापना ठरावाला सभासदांनी विरोध करून तो नामंजूर केल्याचा प्रतिदावा केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाभर चर्चेत असलेल्या मविप्र विद्यापीठाबाबत रविवारच्या सभेत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आजच्या सभेत मविप्र विद्यापीठास ९ हजार ४५० सभासदांनी पाठिंबा दिल्याचा दावा सरचिटणीस ॲड, नितीन ठाकरे आणि सत्ताधारी गटातील इतर पदाधिकाऱ्यांनी सभेनंतर केला. त्याला डॉ. ढिकले यांनी आक्षेप घेतला आहे, मुळात विद्यापीठ निर्माण हा केवळ सत्तेतील लोकांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होता. त्याला सभासदांचा कडाडून विरोध होता. मी स्वतः तर त्याबाबत सातत्याने उघड विरोधी भूमिका घेतली. सभेमध्ये आठव्या ठरावाच्या वेळी प्रचंड विरोध होवून गदारोळ झाला. त्यानंतर राष्ट्रगीत होवून सभा संपली. मग विद्यापीठ स्थापना ठरावाला सभासदांच्या सहमतीचा मुद्दा येतोच कुठे, असा सवाल डॉ. ढिकले यांनी केला. विद्यापित स्थापन करून सत्ताधाऱ्यांना नेमके काय साधायचे आहे, हा आपल्यासह हजारो सभासदांना पडलेला प्रश्न असल्याचे ते म्हणाले.
Comments are closed.