मुंबई/एनजीएन नेटवर्क
देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष ‘इंडिया’च्या बैठकीनंतर राज्यभरात ठिकठिकाणी वज्रमूठ सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या सभांना शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काही ठिकाणी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे देखील हजेरी लावणार आहे. ‘इंडिया’ची बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाल्यानंतर सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. याशिवाय महाविकास आघाडीचे एकत्रित संघटन व महाराष्ट्राला सक्षमपणे ठाम पर्याय देण्याचा प्रयत्न आघाडीचा असणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) पुन्हा एकदा राज्यभरात सभा घेणार आहे. या सभांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करणार आहे. आघाडीमध्ये जागावाटपासून नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य येत असताना पुन्हा एकदा सभा सुरु होणार आहेत.