नाशिक/एनजीएन नेटवर्क
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजून काही महिन्यांचा अवधी बाकी असताना नाशिकमध्ये मात्र राजकीय पक्षांचे बाहू फुरफुरायला लागले आहेत. मागील आठवड्यात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील दोन्ही जागा लढवण्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नाशिकची जागा लढवण्याचा निर्धार जाहीर करत आपला उमेदवारही जाहीर केल्याने महाविकास आघाडीतच घमासान होण्यालायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसने निरीक्षक म्हणून जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही जागा आम्ही लढवणार आहोत, अशी घोषणा डॉ. पाटील यांनी निउक्त्याच झालेल्या बैठकीत केली होती. कॉंग्रेसच्या या निर्णयाला ठाकरे गटाने अप्रत्यक्ष विरोध केला असून दिंडोरीची जागा देखील लढविण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या दोन्ही जागांवरून महाविकास आघाडीत वादाला तोंड फुटले आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे असे असताना परस्पर नाशिकच्या दोन्ही लोकसभेच्या जागा लढविण्याचा निर्णय पाटील यांनी जाहीर केल्याने सदरची बाब शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे शिवसेनेने भूमिका जाहीर करताना नाशिक लोकसभा मतदार संघाची जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त करताना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे शिवसेनेचे उमेदवार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
विजय करंजकर सेनेचे उमेदवार
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील स्थानिक पातळीवर सूचना देताना शिवसेनेकडून स्थानिक व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एकनिष्ठ शिवसैनिकालाच संधी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. अडचणीच्या काळात पक्षाला खंबीरपणे साथ देणाऱ्यांनाच आता निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल त्या अनुषंगाने विजय करंजकर हेच उमेदवार असल्याचे शिवसेनेने देखील जाहीर केले आहे. यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीत निवडणुकीपूर्वीच वादाला तोंड फुटल्याचे मानले जात आहे.