मुंबई/एनजीएन नेटवर्क
महानगरात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले आहे. पावसामुळे शहरातील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. जुलै महिन्यातल्या महानगरातील पावसाचा रेकॉर्ड यंदा मोडीत काढला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. 21 जुलैपर्यंत प्रथमच 1,000 मिमी आणि त्यानंतर पाच दिवसांत मुंबापुरीत 1,000 मिमी पावसाची नोंद झाली.
कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे 124.8 मिमी आणि 124 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. चर्चगेट, मरीन लाइन्समध्ये रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दादर, माटुंगा, किंगसर्कल, लालबाग, अंधेरी, कुर्ला आदी ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी पाण्याच्या निचऱ्यासाठी काम करत आहेत. सततच्या मुसळधार ते अती मुसळधार पावसामुळे पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. बुधवारी मुंबईतील अतिवृष्टीने जुलै 2020 मधील 1,502.6 मिमीचा विक्रम मोडला आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत एकूण 1512.7 मिमी पाऊस झाला असून, यंदाच्या जुलै महिन्यात पावसाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. जुलै 2005 मध्ये एकूण 1454.4 मिमी पाऊस पडला होता. या महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण 58 मिमी कमी आहे. महिनाभरात मुंबईत 2000 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात 21 जुलैपर्यंत प्रथमच 1,000 मिमी आणि त्यानंतर पाच दिवसांत 1,000 मिमी पावसाची नोंद झाली.