मुंबई : राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासूनच शाळा आणि कॉलेज सुरु होत असून राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांना एक गुड न्यूज दिली आहे. आता विद्यार्थ्यांना एसटी प्रवास पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये वितरित करणार आहे. यामुळे पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी कार्यालयांमध्ये रांगा लावण्याची गरज भासणार नाही. परिणामी त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी विद्यार्थी अथवा त्यांचे पालक एसटीच्या पास केंद्रांवर जाऊन रांगेत उभे राहून पास मिळवत असत. अनेकदा गटागटाने आगार कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र शाळा आणि महाविद्यालयांनी दिलेल्या नावाच्या यादीनुसार, संबंधित विद्यार्थ्यांना पास थेट त्यांच्या शैक्षणिक संस्थेत एसटी कर्मचारी पोहोचवतील.