NGN News
Latest Marathi News

सुरक्षित दिवाळी साजरी करा; सुरक्षितता सूचनांसह महावितरणचे आवाहन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

दिवाळीचा सण जवळ आला असून सर्वत्र उत्साह, सजावट आणि रोषणाईचे वातावरण निर्माण झाले आहे. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिकांनी विद्युत उपकरणांचा वापर करताना सुरक्षिततेचे भान राखावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलतर्फे करण्यात आले आहे.

महावितरणने स्पष्ट केले आहे की, दिवाळीच्या काळात फटाके, रोषणाई आणि सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत उपकरणांमुळे निष्काळजीपणातून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे.

महावितरणतर्फे ग्राहकांसाठी विद्युत सुरक्षिततेच्या सूचना :

दिवे व सजावट योग्य ठिकाणी लावा :
दिव्यांच्या माळा, पडदे, बिछाना, लाकडी वस्तू, पंखे व वीजतारा यांपासून दूर ठेवा.
लहान मुले व पाळीव प्राणी यांच्यापासून दिवे दूर ठेवा.

उच्च दर्जाच्या विद्युत साहित्याचा वापर करा :
प्रमाणित दिव्यांच्या माळा वापराव्यात. तुटलेल्या तारांचा वापर करू नये. आवश्यक असल्यास योग्य इन्सुलेशन टेपचा वापर करून त्या सुरक्षित कराव्यात.

तुटलेले सॉकेट्स व प्लग वापरू नका :
खराब सॉकेट्स किंवा सैल जोडणीमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते.

घर सोडताना सर्व उपकरणे बंद करा :
घरात कोणी नसताना टीव्ही, फ्रीज, गिझर, दिवे व इतर सर्व विद्युत उपकरणांचे स्विच बंद ठेवावेत.
फटाके वीजतारांपासून दूर फोडा :
विद्युत यंत्रणा, ट्रान्सफॉर्मर, खांब किंवा वीजतारांच्या खाली वा जवळ फटाके फोडू नयेत.
विद्युत सॉकेट्सवर जादा भार टाकू नका :
एकाच सॉकेटमध्ये अनेक उपकरणे जोडल्याने ओव्हरलोड होऊन आग लागण्याची शक्यता असते.

आपत्कालीन परिस्थितीत संपर्क :
वीजपुरवठा खंडित झाल्यास काही काळ संयम बाळगावा. महावितरणची यंत्रणा कार्यरत असते.
आपत्कालीन स्थितीत खालील क्रमांकांवर संपर्क साधावा – ग्राहक सुविधा केंद्र (२४x७)
टोल फ्री क्रमांक: १९१२, १८००-२३३-३४३५/ १८००-२१२-३४३५

🌟 “दिवाळीचा प्रकाश आनंददायी आणि सुरक्षित असावा. विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळा आणि ‘सुरक्षित दिवाळी’ साजरी करा!” कसे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाने वीज ग्राहकांना केले आहे.

Comments are closed.