नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तसेच राज्यशासनाच्या माध्यमातून बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन नाशिक येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रम ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विष्णूपंत म्हैसधूणे, डॉ.शेफाली भुजबळ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, कविताताई कर्डक, गौरव गोवर्धने, संजय खैरनार, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, जीवन रायते, बाळासाहेब गीते, चेतन कासव, योगेश निसाळ, संतोष भुजबळ, आकाश कदम, चिन्मय गाढे, नागेश गवळी, प्रसाद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यात विविध विकासाची कामे करून उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक पर्यटन, कृषी, मेडिकल टुरिझमला अधिक वाव आहे. यापुढील काळात आयटीहब सह अनेक उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करून नोकरीच्या संधी निर्माण करण्यात येतील. तसेच राज्य शासनाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवाच्या माध्यमातून ७५ हजार शासकीय नोकरी देण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तरुणांना रोजगारासह, स्वयंम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री स्वयंम रोजगार योजनेच्या माध्यमातून स्ट्रीट फूड वाहनांचे वाटप करण्यात आले आहे. यापुढील काळात तरुणांना रोजगार मिळण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातील. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या युवक पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करून जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने वर्षभर रोजगार मेळाव्याचे उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करण्यात येणार असून हे काम अविरत सुरु राहील असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले.
समीर भुजबळ यांचे यशस्वी नियोजन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी महोत्सवाचे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी यशस्वी नियोजन केले. गेल्या पंधरा दिवसांपासून चोख पद्धतीने नियोजन करून जिल्हा भरात याबाबत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यंत्रणा राबविली. त्यांच्या या यशस्वी नियोजनामुळे या नोकरी महोत्सवामध्ये सुमारे साडेआठ हजारांहून अधिक तरुणांनी नोंदणी केली तर तीन हजारांहून अधिक तरुणांनी प्रत्येक्षरित्या सहभाग नोंदविला.
५० हून अधिक कंपन्या संस्थांचा सहभाग
या नोकरी महोत्सवात पुणे आणि नाशिकमधील नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट, फायन्सस, सेवा या क्षेत्रातील जवळपास ५० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी घेऊन नोकऱ्यांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. या महोत्सवात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी यासह सर्वच विभागातील पात्रताधारक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. या नोकरी महोत्सवासाठी जॉब फेअर इंडिया या कंपनीच्या वतीने सहकार्य करण्यात आले.