पुणे/एनजीएन नेटवर्क
आगामी 72 तासांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. बिपरजॉय चक्रिवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला. त्यामुळे मान्सूनची प्रगती मंदावली. सामान्यपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत पोहोचतो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी एक आठवडा उशिर झाला. मान्सून 8 जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे तो महाराष्ट्रात देखील उशिरा दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मान्सून तळकोकणात दाखल झाला. मात्र त्यानंतर मान्सूनच्या वाटचालीला बिपरजॉय चक्रिवादळाचा अडथळा निर्माण झाला. मान्सूनची वाटचाल रत्नागिरी आणि गोव्यापर्यंत मर्यादीत राहिली. बिपरजॉय चक्रिवादळामुळे 11 ते 18 जूनपर्यंत मान्सूनची वाटचाल संथगतीने सुरू होती. मात्र आता बिपरजॉयचा प्रभाव कमी झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 72 तासांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्रात मुंबई, पुणे, महाराष्ट्रातील दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि इतर प्रदेश व्यापण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 23 जूनपासून मान्सून आणखी सक्रिय होईल असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.