NGN News
Latest Marathi News

मुक्तिधामजवळ रस्ता ओलांडताना ट्रकची धडक; माय-लेकीचा मृत्यू

वाहतूक व्यवस्थेच्या अनास्ठेचे बळी ; नागरिकांकडून संताप व्यक्त

नाशिक रोड : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिकमधील वाहतूक प्रश्नाने जटील रूप धारण केलेले असताना ते मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका घटनेने गडद झाले आहे. नाशिक रोड परिसरात गजबजलेला रस्ता ओलांडताना मायलेकीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सुनिता भीमराव वाघमारे ( ५० वर्षे ) आणि बाळंतपणासाठी माहेरी आलेली त्यांची कन्या शीतल प्रेमचंद केदारे ( २७ ) असे मृत माय-लेकींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, या मायलेकी मुक्तिधाम जवळ रस्ता ओलांडत होत्या. याचवेळी बिटकोकडून मालधक्काकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रकने प्रथम एका कारला , पाठोपाठ दोन रिक्षांना आणि त्यानंतर मायलेकींना जोरदार धडक दिली. यावेळी एकाच गोंधळ उडाला. जमलेल्या नागरिकांनी जखमी मायलेकींना बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना सुनिता वाघमारे यांचा मृत्यू झाला. गरोदर असलेल्या शीतल केदारे यांना पुढील उपचारार्थ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पोटातील बाळ मंगळवारी रात्रीच दगावले, तर शीतल यांचे बुधवारी सकाळी प्राणोत्क्रमण झाले. या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, वाहतुकीचा बोजवारा उडालेला असताना त्याचे नियंत्रण न करणाऱ्या व्यवस्थेलाही अनेकांनी दूषणे देत संताप व्यक्त केला.

Comments are closed.