जयपूर/एनजीएन नेटवर्क
महिला अत्याचारासंदर्भात राजस्थान सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या आणि दोषींना एका मोठ्या गोष्टीला मुकावे लागणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं की, राज्य सरकारनं एक निर्णय घेतला आहे की अल्पवयीन मुली आणि महिलांशी छेडछाड, अत्याचाराचा प्रयत्न करणारे तसेच त्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या आरोपींना आणि दोषींना सरकारी नोकरीपासून प्रतिबंधित करण्यात येणार आहे. त्यासाठी गुन्हेगारांप्रमाणं महिलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या पुरुषांचं पोलीस ठाण्यांमध्ये रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकार आणि पोलिसांद्वारे देण्यात येणाऱ्या चरित्र प्रमाणपत्रांवरही याची नोंद करण्यात येणार आहे. अशा समाजविघातक तत्वांचा सामाजिक बहिष्कार करणं गरजेचं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महिला अत्याचारांसंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.