मुंबई/एनजीएन नेटवर्क
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात ‘केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्र देवेंद्र’ अशी घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बऱ्याचदा दिली गेलीय. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या नव्या घोषणायुक्त मथळ्यानं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना अक्षरश: उधाण आले आहे. मराठी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरील या जाहिरातीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचेच फोटो आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेची जाहिरात असूनही त्यात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दिलेल्या या जाहिरातीवरचा मजकूर नव्या प्रश्नांना तोंड फोडणारा आहे. एका सर्वेक्षणाचा हवाला देत, या जाहिरातून दावा करण्यात आलाय की, एकानाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदासाठी 26.1 टक्के, तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदासाठी 23.2 टक्के पसंती आहे. आणि हाच राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य मुद्दा ठरतोय. दरम्यान, या जाहिरातीवरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत धुसफूस सुरु झाली आहे तर विरोधकांनी भाजपला चिमटे काढले आहेत.