केपटाऊन/एनजीएन नेटवर्क
सब कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट आणि स्मॉल युटिलिटी या OJA श्रेणीतील तीन नव्या प्लॅटफॉर्म्सवर महिंद्राने नवीन ट्रॅक्टर्सचे अनावरण येथे केले. बाजारपेठेच्या विविध गरजा लक्षात घेऊन ही उत्पादने सादर करण्यात आली आहेत. यांमध्ये फोर-व्हील ड्राईव्ह (४डब्ल्यूडी) स्वरुपातील, कॉम्पॅक्ट आणि स्मॉल युटिलिटी श्रेणीमधील ट्रॅक्टर्सची ७ नवीन मॉडेल्स खास भारतीय बाजारपेठेसाठी सादर करण्यात आली. ही मॉडेल्स २० एचपी ते ४० एचपी (१४.९१ केडब्ल्यू ते २९.८२ केडब्ल्यू) या ताकदीची आहेत. विविध अॅप्लिकेशन्ससाठी आणि शेतीतील विविध कामांसाठी या अष्टपैलू प्लॅटफॉर्म्सचा उपयोग होण्यासारखा आहे.
OJA ही श्रेणी सर्वप्रथम भारतात सादर करण्यात येत असून यानंतर ती उत्तर अमेरिका, आसियान गटातील देश, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युरोप आणि सार्क प्रदेशात सादर केली जाईल. २०२४ मध्ये थायलंडमध्ये महिंद्रा पदार्पण करणार आहे व तेथून हा समूह आसियान प्रदेशातही प्रवेश करील.
नवीन OJA ट्रॅक्टर श्रेणीच्या सादरीकरणाप्रसंगी बोलताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’चे प्रमुख हेमंत सिक्का म्हणाले, “हलक्या वजनाच्या ट्रॅक्टरची नवीन OJA श्रेणी ही प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी उर्जेचे पॉवरहाऊस आहे. नाविन्यता आणि तंत्रज्ञान यांचा संयोग असलेल्या OJA ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून महिंद्रा युरोप आणि आसियान गटातील देशांमध्ये नव्याने प्रवेश करणार आहे, तसेच त्यामुळे जागतिक ट्रॅक्टर उद्योगातील २५ टक्के हिस्साही काबीज करू शकणार आहे. चपळ, हलक्या वजनाचे, फोर-व्हील ड्राईव्ह स्वरुपाचे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे हे ७ ट्रॅक्टर्स भारतात सादर करून आम्ही जगभरातील शेतीत क्रांती घडवून आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेला मूर्त रूप देत आहोत.”
OJA च्या भारतातील सादरीकरणाच्या नियोजनाबद्दल माहिती देताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा लि.’च्या ‘फार्म डिव्हिजन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम वाघ म्हणाले, “OJA ट्रॅक्टर श्रेणीमुळे भारतीय शेतीमध्ये परिवर्तन घडून येणार आहे. फोर-व्हील ड्राईव्ह हे प्रमाण मानून बनविण्यात आलेल्या या ट्रॅक्टर्समध्ये काही ऑटोमेशन कंट्रोल्स नव्याने सादर करण्यात आली आहेत. त्यातून या संपूर्ण श्रेणीमध्ये अचूकता आणि कार्यक्षमता निर्माण होते. ट्रॅक्टरचालकाचे श्रम कमी करणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे हे उद्देश आम्ही ठेवल्यामुळे फलोत्पादन आणि द्राक्ष शेती यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या विभागांना न्याय देता येईल आणि यांत्रिकी शेतीची परिभाषा नव्याने प्रस्थापित करता येईल. PROJA, MYOJA आणि ROBOJA या तीन प्रगत तंत्रज्ञान पॅक्समधून आम्ही OJA श्रेणी ‘भारताचे जागतिक नावीन्य’ म्हणून अभिमानाने सादर करीत आहोत. OJA श्रेणी ही आमच्या झहीराबादच्या सर्वात नवीन कारखान्यात बनवली जाईल. ही श्रेणी ऑक्टोबरपासून भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.”
OJA श्रेणी सादर करण्याबरोबरच, ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी म्हणून महिंद्रा आपल्या चॅनल भागीदारांचे नेटवर्क ११००ने वाढविणार आहे.
‘मेड इन इंडिया, फॉर द वर्ल्ड‘
भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रगत ट्रॅक्टर उत्पादन संयंत्रांपैकी एक असलेल्या तेलंगणातील झहीराबाद येथील महिंद्राच्या अत्याधुनिक कारखान्यात महिंद्राची OJA ट्रॅक्टरची श्रेणीचे उत्पादन करण्यात येणार आहे. ट्रॅक्टर उत्पादनाच्या एकात्मिक सुविधा असलेल्या या कारखान्यात ‘महिंद्रा’च्या इतरही ट्रॅक्टर्सची विस्तृत श्रेणी उत्पादित करण्यात येते.