छ. संभाजीनगर/एनजीएन नेटवर्क
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी 2021 मध्ये याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहिती समोर आली.
सत्तार यांनी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्याचं मान्य करत सिल्लोडच्या न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाईल. शिवाय 6 वर्ष निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरतील. शंकरपल्ली यांनी दोन वेळा न्यायालयात धाव घेतली. तिसऱ्यांदा न्यायालयानं मुद्देनिहाय तपासाचे आदेश दिले. सत्तार यांचा जबाबही नोंदवला. 11 जुलै रोजी न्यायाधीश मीनाक्षी धनराज यांनी सत्तारांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे मान्य करत फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहे.