मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यातील सत्तासंघर्षांच्या सुनावणीचे प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्षांकडे आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भांत राहुल नार्वेकरांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षाला म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र जे आमदार सात दिवसांच्या आत लेखी उत्तर सादर करणार नाहीत अशा आमदारांना विधासभा अध्यक्ष प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार आहेत.
या प्रकरणात विधिमंडळाकडून थेट कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा अध्यक्षांकडू आमदारांना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्यांना लेखी उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा आवधी देण्यात आला आहे. मात्र जर या सात दिवसांत लेखी उत्तर न आल्यास संबंधित आमदाराला प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. प्रत्येक आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. शनिवारी विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
प्रतिज्ञापत्र अनिवार्य असणार
शिवसेना पक्षाच्या घटनेची प्रत प्राप्त होताच आता राहुल नार्वेकर हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांच्याकडून दोन्ही पक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेच्या घटनेच्या आधारे हा निर्णय घेतला जाणार आहे. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एकोंमेकांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत दावा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळी आमदारांना पुराव्यासह आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.