NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘डीपीडीसी’ बैठकीत आमदारांकडून अधिकारी वर्ग धारेवर; एकाला भोवळ

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

जिल्हा नियोजन आणि विकास समिती (डीपीडीसी) च्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत आमदारांकडून अधिकारी वर्गाला लक्ष्य करण्यात आले. सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी अधिकाऱ्यांच्या कारभारावर कोरडे ओढल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्यातच आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांना जबाबदार धरत फैलावर घेतल्याने गुंडे यांना सभागृहात भोवळ आली. अखेर पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक गुंडाळली.

  पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक होती. नांदगाव मतदारसंघात बारा कोटींचा नियतव्यय मंजूर असताना एकाही गावासाठी निधी न दिल्याच्या कारणावरून आ. सुहास कांदे यांनी जि. प. अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांना फैलावर घेतले. एका पाठोपाठ एक झालेल्या आरोपांनी गुंडे यांना सभागृहात भोवळ आल्याने गोंधळ उडाला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विविध विषयांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आ. माणिकराव कोकाटे यांनीदेखील अधिकारी अनेक गोष्टींना जबाबदार असल्याचा आरोप केला. संदर्भ रुग्णालयाच्या परस्पर पाच कोटींच्या औषध खरेदीच्या चौकशीची मागणी आ. देवयानी फरांदे यांनी केली. तर मनपाला ना हरकत दाखल्यासाठी कालमर्यादा निश्चितीची मागणी आ. सीमा हिरे यांनी केली. संदर्भ रुग्णालयाच्या औषध खरेदीची चौकशी करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले. मनपाला ना हरकत दाखल्यासाठी ३० दिवसांची मुदत घालून देण्यात आली.

बैठकीत नरेगा, जिल्हा परिषदेकडून खर्च न झाल्याने परत जाणारा निधी, रखडलेल्या क्रीडा योजनेतील कामे, आदिवासी विकास विभागाचा कारभार, मनपाकडून ना हरकत दाखला न मिळाल्याने रखडणारी कामे आदी विषयांवर वादळी चर्चा झाली. यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपती घेण्यात आली.

——————————–

 आ. कांदे यांचे गंभीर आरोप

@ आ. सुहास कांदे यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुुन गुंडे यांच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले. आपल्या मतदारसंंघातील ४८ पैकी एका गावालाही मंजूर नियतव्यय दिला गेला नाही. गुंडे यांचे ठेकेदारांशी लागेबांधे असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावर गुंडे यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण कांदे यांच्या आरोपांच्या फैरी सुरु राहिल्या. याचवेळी गुंडे यांना भोवळ आली. इतरांनी त्यांंना सावरले. 

Leave A Reply

Your email address will not be published.