मुंबई/एनजीएन नेटवर्क
आमदार अपात्रता प्रकरणी 14 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे अशी माहिती विधीमंडळाच्या सूत्रांनी दिलीय. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यात सुरूवात झालीय. शिवसेना शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आलीय अशी सूत्रांची माहिती आहे. आमदारांना सुनावणीत सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसेच अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी युक्तीवादही करावा लागेल. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली होती. 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन राज्यात सरकार स्थापन केलं होतं. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. यानंतर माहाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरु झाला होता. त्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री शिंदेसोबत गेलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र सत्तांतर होताच विधानसभा अध्यक्षांकडे शिंदे गटाने ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत निर्णय घेण्यास सांगितलं होतं. अशातच आता याप्रकरणी 14 सप्टेंबरपासून सुनावणी सुरु होणार आहे.