नाशिक/एनजीएन नेटवर्क
यंदाच्या आमदार डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांचे पाल्य, भटक्या कुटुंबातील मुलांसह देहविक्री करणाऱ्या कुटुंबातील मुलींना सांभाळणाऱ्या सचिन खेडकर यांच्या ‘उचल फौंडेशन’ला हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती ‘नील वसंत फौंडेशन’च्या प्रमुख तथा पुरस्कार समिती अध्यक्ष नीलिमा पवार यांनी दिली. एक लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असणार असून येत्या ७ ऑक्टोबर रोजी रावसाहेब थोरात सभागुहात होणाऱ्या सोहळ्यात त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
‘उचल फौंडेशन’ संदर्भात माहिती देताना पवार म्हणाल्या, सचिन खेडकर हा ऊसतोड कामगार कुटुंबातील युवक असून वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याचे मातृछत्र हरपले. बालपणापासून त्याने ऊसतोड कामगार तसेच त्यांच्या कुटुंबांतील हालअपेष्टा अनुभवल्या आहेत. या कुटुंबातील बालकांसाठी त्यांनी २०१८ मध्ये ‘उचल फौंडेशन’ची मुहूर्तमेढ रोवली. पत्नी सुजाता खेडकर यांच्या मदतीने ३५ बालकांना वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची दाखल घेत यंदाच्या आमदार डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कारासाठी ‘उचल फौंडेशन’ची निवड करण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी डॉ. प्राची पवार, वसंत खैरनार, रंजना पाटील, रवींद्र मणियार, विजय कोठारी आदी उपस्थित होते.