मुंबई/एनजीएन नेटवर्क
आगामी लोकसभा निवडणुक पूर्वतयारीच्या दृष्टीने मुंबई येथे नुकतीच राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत लोकसभा क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती मिळावी,याकरिता राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघनिहाय निरिक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या निर्देशावरून लोकसभा क्षेत्र निहाय निरिक्षक व समन्वयकांची नियुक्ती प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांनी जाहीर केली आहे.
प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी नाशिक जिल्ह्यातील चार प्रदेश पदाधिकारी यांच्याकडे चार लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील यांच्याकडे नंदुरबार लोकसभा , माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश पदाधिकारी शरदराव आहेर यांच्याकडे ठाणे लोकसभा ,माजी मंत्री डॉ.शोभाताई बच्छाव यांच्याकडे धुळे लोकसभा तर प्रदेश काँग्रेस सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडे शिर्डी लोकसभा मतदार संघाची समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच नाशिक जिल्हयातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी ज्येष्ठ नेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात यांची वरिष्ठ निरिक्षक म्हणून तर डॉ.राजू वाघमारे व ब्रीज दत्त यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यानुसार वरील प्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या लोकसभा निरिक्षक व समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी दि.७ ते १४ ऑगस्ट,२०२३ यादरम्यान लोकसभा मतदार संघाचा विधानसभा निहाय दौरा व बैठकीचे नियोजन करण्यात येणार असून त्यासाठी त्या-त्या लोकसभा क्षेत्रातील आजी-माजी खासदार/आमदार,प्रमुख नेते,प्रदेश पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष,आघाडी संघटना विभाग व सेलचे जिल्हा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांना बैठकीत निमंत्रित केले जाणार आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेल्या वरील सर्व पदाधिकारी यांचे नाशिक जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.