नागपूर : एनजीएन न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर येथे पार्किंगच्या वादातून इलेक्ट्रॉनिक मीडियामधील पत्रकारांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. युवा आणि क्रीडा संवाद या क्रीडा विभागाच्या कार्यक्रमानिमित्ताने ते सध्या नागपूरात आहेत.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हा हल्ला अत्यंत दुर्दैवी असून, सरकार म्हणून आम्ही याकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी मी तात्काळ नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे आणि तातडीने कडक कारवाईचे निर्देश दिले असल्याचे कोकाटे म्हणाले.
या हल्ल्यात झालेल्या जखमी पत्रकारांची वैद्यकीय स्थिती समजून घेण्यासाठी मंत्री कोकाटे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली असून, नाशिक येथे परत आल्यानंतर त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी सरकारकडून पत्रकार संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने तात्काळ आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असा माझा ठाम विश्वास व्यक्त करताना भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात ठोस कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.