NGN News
Latest Marathi News

लक्षवेधी पालखी मिरवणुकीने म्हाळसा माता पुण्यतिथी सोहळ्याचा प्रारंभ

  • हजारो महिला आठवडाभरासाठी मौनव्रतात..
  • महिला जपानुष्ठान सोहळ्याचा भक्तीपूर्ण प्रारंभ…

ओझर : अमर आढाव
पहाटे ब्रह्ममुहूर्ताची वेळ… महिला जपानुष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने जनशांती धाम अवघे गजबजलेले.. हजारो महिलांची देवदर्शन व नित्य नियम विधीपाठ साठी लगबग…जगदगुरु शांतिगिरीजी महाराजांची पावन उपस्थिती होताच..प्रचंड जयघोषात त्यांचे जंगी स्वागत..विधी,भागवत वाचन,सत्संग,महाआरती नंतर ओझर परिसरातून लक्षवेधी स्वरूपात पालखी मिरवणूक निघाली..मिरवणुकीत ७७७ किलो चांदीचा रथ,भगवान बाणेश्वराचे भव्य चांदीचे मुकुट.. जगदगुरूंच्या पालखीचे दिव्य दर्शन.. अशा लखलखत्या वैभवात निघालेल्या मिरवणुकीच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी..सडा संमर्जन, रांगोळी,पुष्प वृष्टी.. आरतीचे ताट,पुष्पहार घेऊन स्वागताची तयारी..यामुळे अवघे वातावरण मंगलमय,भक्तिमय झालेले…असेच काहीचे अविस्मरणीय चित्र महिला जपानुष्ठान सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी पहायला मिळाले.

कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मातोश्री म्हाळसा माता तसेच उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मातोश्री फुला माता यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणासाठी ओझर येथील जनशांती धामात महिला जपानुष्ठान सोहळ्याचा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर नित्य नियम विधी, भागवत वाचन, प्राणायाम,ध्यान, आरती,सत्संग, ओझर परिसरातून
लक्षवेधी पालखी मिरवणूक संपन्न झाली.

यानंतर आयोजित सत्संग प्रसंगी उपस्थित हजारो महिलांच्या मौन व्रताचा प्रारंभ करण्यात आला.यात काही महिलांनी हवेवर,काही महिलांनी पाण्यावर तर काही महिलांनी दुधावर,फळावर आठवडाभर उपवास करत अनुष्ठान करण्याचा संकल्प केला. या सोहळ्या दरम्यान आठवडाभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोहळ्यात खास महिला साधिकांसाठी जपानुष्ठान, अखंड नंदादीप, महायज्ञ, अभिषेक पूजन, हस्तलिखित नामजप, श्रमदान, रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, दिवसातून चार वेळा विधी-पाठांतर, भागवत वाचन, सत्संग, महाआरती आदी विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम संपन्न होणार आहे. महिला सक्षमीकरणाचा संदेश देत, संपूर्ण आठवडाभर महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे.

सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.अहिल्या देवी, जिजा माता,झाशीची राणी,कौसल्या माता,अंजनी माता,म्हाळसा माता यांसह अनेक वीर मातांच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली.आणि महिला शक्तीचा गौरव केला.यावेळी विवेकानंद महाराज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आश्रमीय कार्याची माहिती दिली.मिरवणुकीतही उपस्थिती दिली. ब्र.रामानंद महाराज यांनी अनुष्ठान नियम व अध्यात्मिक मार्गदर्शन केले.यावेळी आश्रमीय संत,भाविक मोठ्या संख्यने उपस्थितीत होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी आश्रमाच्या विविध समिती,कमिटी प्रयत्नशील आहे

Comments are closed.