नाशिक/एनजीएन नेटवर्क
आधुनिक युगातील विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीकोनातून सातत्याने उपक्रम राबवणाऱ्या न्यू एरा इंग्लीश स्कूलच्या वतीने ‘मेटाव्हर्स’ नामक ज्ञानवर्धक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा नवा पैलू आत्मसात करण्याची संधी शाळेच्या विद्यार्थ्यांना लाभली.
शाळेच्या सभागृहात आयोजित या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आभासी तंत्रज्ञानाद्वारे ओळख तयार करून त्याद्वारे संवादाचे माध्यम म्हणून ‘मेटाव्हर्स’कडे पहिले जाते. त्याची ओळख यानिमित्त विद्यार्थ्यांना झाली. या नूतन संकल्पनेची व्याख्या, त्याचे समाज, अर्थव्यवस्था, शिक्षण आदी घटकांवर होवू शकणारे परिणाम यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवाय या आभासी क्षेत्राच्या माध्यमातून सर्जनशीलता, सहयोग आणि वैयक्तिक विकासासाठी कोणत्या संधींची कवाडे उघडली जावू शकतात, याचाही धांडोळा घेण्यात आला. अनेक देशांनी अंगीकारलेले हे माध्यम भारतातही मूळ धरू पाहत असल्याने आजच्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणाशी नाते जोडलेल्या विद्यार्थ्याला त्याचे धडे देवून न्यू एरा इंग्लीश स्कूलने एकप्रकारे दूरदृष्टीची प्रचीती दिली आहे. या उपक्रमात सहभागी होताना एक समृद्ध आणि परस्परसंवादी अनुभवाचे आकलन केल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली.
विद्यार्थ्यांना ‘मेटाव्हर्स’ बाबत प्राथमिक धडे गिरवायला लावून राबवणाऱ्या न्यू एरा इंग्लीश स्कूलने शैक्षणिक नवोपक्रमातील सातत्य अधोरेखित केले आहे. लहानशा वयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी ओळख करून देताना शाळेचा शिक्षणाभिमुख आणि परिवर्तनवादी दृष्टीकोन अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून सिद्ध झाला.