मुंबई/एनजीएन नेटवर्क
महाराष्ट्र राज्यात गेल्या सात महिन्यांत सर्वाधिक ५७८ अपघाती मृत्यू नाशिकमध्ये झाले. राज्यात रस्ता अपघातांत १५ हजार २२४ मृत्यू झाले असून, देशात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.विशेषत: दुचाकी अपघाती मृत्युंमध्ये हेल्मेट न घातल्याने सर्वाधिक मृत्यू झाले. तर, समृद्धी महामार्गावरील अपघातातील १०१ बळी हे मनुष्य चुकीमुळेच गेले आहेत.
रस्ता अपघातांत बळी जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. जगभरातील रस्ता अपघातात वर्षाला १३ लाख मृत्युमुखी पडतात, तर भारतात एक लाख ५३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
एकीकडे विकासासाठी रस्त्यांची निर्मिती होत असताना दुसरीकडे हेच रस्ते वाहतूक नियमांचे पालन वाहनचालकांकडून होत नसल्याने मृत्युचे सापळे बनले आहेत. रस्ते अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्रातही महामार्ग वाहतूक पोलिस विभागामार्फत जनजागृतीसह वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
प्राप्त आकडेवारीनुसार, नाशिक शहरात ब्लॅकस्पॉटची संख्या २३ तर ग्रामीण भागात ३९ इतकी आहे.