नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडियाने ‘मारुती ३.०’ अंतर्गत २०३०-३१ पर्यंत जवळपास २८ मॉडेल्स बाजारात आणण्याची योजना आखली आहे. यासह, कंपनीची उत्पादन क्षमता २० लाख युनिट्सपर्यंत (सध्याच्या उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त) वाढविण्याचे उद्दिष्ट असेल. कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता ८ वर्षांत ४० लाख युनिट्सपर्यंत दुप्पट करण्यासाठी सुमारे ४५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
मारुतीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले की, कंपनीने ४० वर्षांत २ दशलक्ष युनिट्सचे उत्पादन आणि विक्री गाठली आहे. पुढील ८ वर्षांत आणखी २ दशलक्ष युनिट्स जोडण्याची योजना आहे, असे त्यांनी सांगितले. कंपनीने २०३०-३१ पर्यंत सुमारे २८ भिन्न मॉडेल बाजारात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचा अर्थ, येत्या काही वर्षांत मारुती सुझुकी अतिशय आक्रमक मोडमध्ये असेल. टाटा, महिंद्रासह इतर कार कंपन्यांना मारुती सुझुकीशी स्पर्धा करायची असेल, तर त्यांनाही अनेक नवीन मॉडेल्स आणावी लागतील. टाटा आणि महिंद्राची अनेक उत्पादनेही बाजारात येण्याच्या तयारित आहेत.