नाशिक/एनजीएन नेटवर्क
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने सर्व १४ तालुका मराठी पत्रकार संघांनी तालुकास्तरावर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत प्रांत/पो.उपअधीक्षक/तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देत जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध संघटनांनी प्रत्यक्ष सहभाग दर्शवत आंदोलनास पाठिंबा दिला.
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांचेवरील हल्ला व आ.पाटील यांनी केलेल्या अर्वाच्य शिवीगाळ निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेसह विविध ११ पत्रकार संघटनांनी राज्यपालांनी भेट घेऊन कारवाईची मागणी केली व आजच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते.त्या अनुषंगाने परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार हल्ला विरोधी संरक्षण कायद्याचे जनक एस.एम.देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली आज राज्यात तसेच नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक यशवंत पवार यांचे नेतृत्वाखाली जिल्हा संघाशी संलग्न असलेल्या नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, ईगतपुरी, दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, नाशिक व त्र्यंबकेश्वर आदि १४ तालुक्यात तालुका मराठी पत्रकार संघांनी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत प्रांत/तहसीलदार व पोलीस अधिकारींना निवेदने दिली.
या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी प्रत्यक्ष सहभाग घेत पत्रकार एकजुटीचा संदेश जिल्हाभर दिला. आंदोलन यशस्वी केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, माजी जिल्हाध्यक्ष तथा मार्गदर्शक यशवंत पवार,जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांनी आभार व्यक्त केले.