एनजीएन न्युज नेटवर्क
होणार, नाही होणार.. अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारी उध्दव-राज या ठाकरे बंधूंची युती दृष्टीपथात येऊ लागली आहे. दोहोंमधील अलीकडील भेटींमुळे उबाठा-मनसे कार्यकर्त्यांनीही तशी मानसिकता तयार केल्याचे किमान त्यांच्या प्रतिसादावरून जाणवते आहे. राज्याच्या राजकारणाला नवा आयाम देणारी घडामोड म्हणून या समीकरणाकडे पाहण्यास हरकत नाही. ‘ठाकरे ब्रांण्ड’ म्हणवल्या जाणाऱ्या राजकीय व्यवस्थेतील दोन बिनीचे नेते वज्रमूठ आवळताहेत, याची दखल घेणे संपूर्ण राजकीय व्यवस्थेला घेणे आवश्यक ठरणार आहे. तथापि, मराठी मुलखात गेल्या दोन-अडीच वर्षांत झालेली उलथापालथ लक्षात घेता हे मनोमिलन उत्स्फूर्ततेपेक्षा अपरिहार्यतेच्या कसोटीवर होत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नाशिकमध्ये स्थानिक प्रश्नी दोन्ही पक्षांची बांधली गेलेली मोट त्याचा ट्रेलर मानायला हवा.
‘मातोश्री’ वरील कथित बडव्यांना कंटाळून राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख हयात असताना एकसंध शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात ‘मनसे’ या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. महापालिका, विधानसभा निवडणुकांत या पक्षाला मुंबई-पुणे-नाशकात दखलपात्र यश मिळालेदेखील होते. हा शत-प्रतशित राज यांच्या नेतृत्वाचा करिष्मा होता. मात्र, त्यामध्ये पक्षाला सातत्य राखता आले नाही. केवळ शहरी तोंडावळ्याच्या या पक्षाचे कालौघात विघटन होत गेले. अनेक बडे नेते पक्ष सोडून गेल्याने संघटन खिळखिळे झाले. भाजपची साथ सोडल्यानंतर उध्दव यांच्या शिवसेनेचा प्रवासही त्याच दिशेने होत राहिला. एकनाथ शिंदे यांनी समकक्ष शिवसेना उभी करून उध्दव यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले.
आज उध्दव यांची सेना आणि राज यांची मनसेना यांचे राजकीयदृष्ट्या मूल्यमापन करायचे म्हटले तर ‘संघटनदृष्ट्या विकलांगता’ हा दोहोतला समान धागा ठरावा. आधी मराठी माणूस आणि अलीकडे हिन्दुत्वाचा शंखनाद करणाऱ्या या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडे गर्दी जमवण्याचे कौशल्य असले तरी त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्याची जादू नाही. अलीकडील निवडणूकांत ही बाब सिध्ददेखील झालीय. एवढेच कशाला, ज्या मुंबापुरीतून दोन्ही सेनांच्या जन्म आणि वर्धिष्णू होण्याच्या चर्चा झडतात, तिथेच विधानसभेत ‘राज’पुत्र हरले अन् ‘उध्दव’पुत्र काठावर निवडून आलेत. हा दोहांनाही ‘जागते रहो’ चा इशारा ठरावा. मराठी माणूस खरोखर आपल्यासोबत आहे का आणि तो राहिला नाहीये या अपेक्षित उत्तरानंतर तशी स्थिती का उद्भवली याचे ठाकरे बंधूंना उत्तर मिळाल्यानंतरच कथित मनोमिलन करण्याची उपरती त्यांना सूचली नसेल कशावरून ?
भावनाधारित राजकारण करण्याचे दिनू आता संपले आहेत. जाती-पातीच्या राजकारणाला थारा न देण्याची प्रगल्भताही मराठी माणसांत आली आहे. जनतेला आपल्या भावना जपणारा, सहजगत्या उपलब्ध होणारा, विकासाची दृष्टी असणारा नेता हवा आहे. महाराष्ट्रातील घराणेशाहीही लोकांनी उलथवून टाकली आहे. एखाद्या पक्षाने लादलेल्या उमेदवाराला निमूटपणे मतदान करणार नाही, हे धारिष्ट्य दाखवणारी पिढी पुरोगामी महाराष्ट्रात तयार झाली आहे. एक व्हिजन असलेला, विकासाची आस असलेला पक्ष म्हणून लोक भाजपकडे आकर्षित होताहेत. तेव्हा किमान राजकीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, आपापले अस्तित्व जपण्यासाठी ठाकरे बंधूंना अवघी दिशा बदलावी लागेल. कार्यकर्त्यांना आपलेसे करायचे, स्वत:मधील नेतृत्वात चमक आणि प्रगल्भता अधोरेखित करायची असेल तर त्यासंदर्भातील शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांचे गुण आत्मसात करावे लागतील. भेटायला आलेल्यांना ‘साहेबांचा मूड’ कसा असेल, याबाबत मनात शंका निर्माण होण्याऐवजी साहेब आपल्याला ऐकून घेतील , ह्या आत्मविश्वासाची पेरणी करणारे नेतृत्व तयार करण्याची अपरिहार्यता स्विकारावी लागेल.
केवळ गर्दी जमवून, टाळ्या मिळवून, सत्ताधाऱ्र्यांवर कमरेखालील टीकेचे बाण सोडून किंवा टिंगलटवाळी करून पक्ष वाढत नसतो. सातत्याने सत्तेची ऊब मिळवून असलेले नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस खासदार-आमदारांसह पक्ष पदाधिकारी यांना ‘लोकांमध्ये मिसळा, त्यांच्या भावनांची कदर करा’ हा कानमंत्र देत असतात. त्यांचे अनुकरण करण्यातही काही गैर नाही. मुंबईतील मेळाव्यांमध्ये केवळ सत्तेतल्या लोकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे ‘रव’ ऐकून अवघ्या सैनिकांचे कान विटले आहेत. त्यांना नवी दिशा, नवे व्हिजन, रचनात्मक कार्यक्रम, लोकाभिमुख उपक्रम यांबाबत मार्गदर्शन हवे आहे. यादृष्टीनेच ठाकरे बंधूंकडून अपेक्षा आहेत. दोहोंच्या ऐक्यातून असेच काही नवनिर्माण होईल, या आशेने तरी पक्षांमध्ये उरलेले कार्यकर्ते टिकून आहेत, एवढेच यानिमित्ताने !
ता. क. : राज यांना नाशिककरांनी नाकारले, अशी खंत नाशकात ‘जनाक्रोश’ मोर्चावेळी आलेल्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यम संवादादरम्यान व्यक्त केली होती. हे सगळे का आणि कसे झाले असावे, याचा आढावा स्थानिक स्वपक्षीयांना विश्वासात घेऊन ‘कानगोष्टी’ केल्यास त्यांना अपेक्षित ‘फिडबॅक’ नक्कीच मिळेल
Comments are closed.