नाशिक/एनजीएन नेटवर्क
महिला सुरक्षा कक्षातील भरोसा सेलमध्ये एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, दिवसाढवळ्या महिला पोलिसांच्या समोरच हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील शरणपूर परिसरातील महिला सुरक्षा कक्षातील भरोसा कक्षात पती-पत्नीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पती-पत्नीच्या वादातून महिलेच्या मामाने पतीला सुऱ्याने भोसकत हत्येचा प्रयत्न केला. मुलीच्या मामाने थेट महिला पोलिसांच्या उपस्थितच हल्ला केला आहे. आरोपीचे नाव नानासाहेब नारायण ठाकरे असे आहे. पती-पत्नी दोघांमध्ये वाद आहेत. त्यामुळं दोघांचे समुपदेशन सुरु आहे. आज दोघांचीही तिसरी तारीख होती. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीचा मामा यात मध्ये पडला आणि त्याने महिला सुरक्षा कक्षातच पतीवर चाकुने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. संतोष पंडित असे जखमी पतीचे नाव असून दहिवड (ता देवळा) येथील रहिवाशी आहे. तरुणावर चाकूने वार केल्यामुळं भरोसा कक्षातच रक्ताचा सडा पडला होता. घटनेनंतर आरोपीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कक्षेत महिला पोलिस असल्यांनी त्यांनी त्याला तातडीने पकडले व पोलिसांच्या हवाली केले.