नाशिक रोड : एनजीएन न्यूज नेटवर्क
वडनेर दुमाला भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या आयुषचा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभाग नागरिकांच्या रडारवर येऊन दोन दिवसांपूर्वी वडनेर दुमालासह परिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग कार्यालयावर बिबट्या जेरबंद करा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. बिबट्याला पकडा अन्यथा वन मंत्र्याच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा दिल्यानंतर अवघ्या २४ तासात या परिसरात एक बिबट्या शुक्रवारी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
आयुषच्या मृत्युनंतर वनविभागाच्या वतीने बिबट्या जेरबंद होण्यासाठी दुमाला भागात आधीचे दोन आणि घटनेनंतर दोन पिंजरे लावण्यात आले. बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तीन ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले. इतके सारे होऊनही बिबट्या वनविभागाला दोन आठवड्यापासून गुंगारा देत होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाराज ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला. बिबट्याला जेरबंद करा अन्यथा वनमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा, कार्यालयात बिबट्या सोडू असा इशारा देण्यात आला होता.
शुक्रवारी दुपारी वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले. कारण नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात बंद झाला. त्यामुळे वडनेरमधील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
Comments are closed.