मालेगाव/एनजीएन नेटवर्क
राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मालेगाव येथील गिरणा साखर कारखान्यात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अपहार केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी मालेगाव न्यायालयात पालकमंत्री भुसे यांनी मानहानीची तक्रार दाखल केली आहे. यासाठी न्यायालयाकडून खासदार राऊत यांना 23 ऑक्टोबरला खुलासा सादर करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गिरणा साखर कारखाना वाचविण्यासाठी नवीन स्थापन केलेल्या कंपनीत अपहार झाल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला होता. यासंदर्भात राऊत यांना पालकमंत्री भुसे यांनी मालेगाव येथील कंपनीच्या सर्वसाधारण सभेत येऊन अपहार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी उपस्थित राहावे, असे जाहीर आमंत्रण दिले होते. पण खासदार राऊत बैठकीला न राहिल्याने भुसे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवत मालेगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी 23 ऑक्टोबरला न्यायालयात सुनावणी होणार आहे.