मुंबई/एनजीएन नेटवर्क
मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलल्यानंतर ‘हायकमांड’ आता महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आहे. ज्याप्रमाणे बीएमसी निवडणुकीपूर्वी भाई जगताप यांना हटवून वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती, त्याचप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी लक्षात घेऊन लवकरच नाना पटोले यांच्या जागी नव्या कारभाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
पक्षाला पुन्हा एकदा संजीवनी देण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीत फेरबदल होण्याची शक्यता आहे. सध्या नाना पटोले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल अनेकांनी नाराजी नोंदवली आहे. सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी झालेले आशिष देशमुख असोत किंवा त्यांच्या आधी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात असोत किंवा त्यांच्या आधी सचिन सावंत असोत, या सर्वांनी नानांवर वेगवेगळ्या प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. या गोष्टी नाना पटोले यांच्या विरोधात जाऊ शकतात. मात्र, नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवणार असल्याचा दावा केला आहे.