मुंबई/एनजीएन नेटवर्क
मुंबई ते नागपूर दरम्यानचा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून 31 जुलैपर्यंत म्हणजे गेल्या साडेसात महिन्यात तब्बल 729 अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये आतापर्यंत 101 जणांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणदे यापैकी 53 जणांचा मृत्यू हा रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान झालेल्या अपघातात झाला आहे. महामार्ग पोलीस अप्पर पोलीस महासंचालक रवींद्रकुमार सिंगल यांनी ही माहिती दिलीय.
तसेच समृद्धी महामार्गावर 11 डिसेंबर 2022 ते 31 जुलै 2023 दरम्यान वाहनांच्या पुढे प्राणी आल्यामुळे तब्बल 83 अपघात झाले आहेत. या अपघातांमुळे एकाचा मृत्यू तर 25 जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून झालेल्या 729 अपघातांपैकी 338 अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. तर 391 किरकोळ व गंभीर अपघातात 101 मृत्यू व 748 प्रवासी जखमी झाले आहेत.
242 अपघात चालकाच्या डुलकीमुळे
समृद्धीवारील 729 पैकी 242 अपघात हे चालकाला लागली झोप(डुलकी) वा थकव्यामुळे झाले असून अशा अपघातात 44 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यू हे रात्री 12 ते रात्री 3 दरम्यान नोंदवले गेले. रात्री 3 ते पहाटे 6 दरम्यान 6 अपघातात 9 मृत्यू झाले. पहाटे 6 ते दुपारी 12 पर्यंत 13 अपघातात 21 मृत्यू झाले. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 पर्यंत 11अपघातात 17 मृत्यू झाले. रात्री 9 ते रात्री 12 पर्यंत 5 अपघातात 10 मृत्यू झाले आहेत. तर यांत्रिकी बिघाडामुळे 27 अपघात झाले असून त्यापैकी 11 मध्ये कुणीही जखमी झाले नाही. तर अतिवेगात वाहन चालवल्याने 128 अपघात झाले आहेत.