येवला/एनजीएन नेटवर्क
येथील बहुचर्चित कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी तथा व्यवस्थापक अजय जैन याला अखेर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जैन याचा पुतण्या अक्षय छाजेड यालाही पोलिसांनी गजाआड केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या अजय जैन यास मनमाडच्या माधवनगर परिसरातून अटक करण्यात आली.
पारख पतसंस्थेत संचालक मंडळ, व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी संगनमताने विविध योजनांच्या माध्यमातून आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत तब्बल २१ कोटी १६ लाख ९९ हजार ८५० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. खातेदार आणि ठेवीदार यांच्या या फसवणुकीमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची भावना निर्माण झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून अजय जैन हा फरार होता. आजवर जैन हा विविध राज्यांत लपून वास्तव्य करीत असल्याची पोलिसांना कुणकुण होती. अखेर त्याला मनमाड येथून अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश मिळाले. याशिवाय, याच गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपी अक्षय रवींद्र छाजेड ( रा. विंचूर रोड, येवला ) याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
४ दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, घोटाळाप्रकरणी ताब्यात घेतलेल्या जैन द्वायींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मुख्य आरोपी ताब्यात आल्याने आता या घोटाळ्यातील अनेक बाबींची उकल होण्याची शक्यता गडद झाली आहे. पतसंस्थेचे सुमारे साडेबारा हजार सभासद असून ठेवींची संख्या ७८ कोटींच्या घरात आहे. पतसंस्थेतील अनियमिततेपोटी नोव्हेंबर २०२१ मध्ये तत्कालीन सहकार उपनिबंधकांनी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.