इम्फाळ/एनजीएन नेटवर्क
मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याप्रकरणी आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर कारवाई केली आहे. महिलांची धिंड काढणाऱ्या गर्दीमधील मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पेची अवांग लीकाई येथे राणाऱ्या 32 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव हुइरेम हेरोदास मेइतेई असे आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या आरोपीचे 2 फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये पीडित महिलेच्या छातीवर दोन्ही हात ठेऊन तिला शेतात घेऊन जात असलेल्या व्हिडीओमधील स्क्रीनशॉटचा आहे तर दुसरा फोटो या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतरचा आहे.
मणिपूर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या अटकेसंदर्भात ‘हिंदुस्तान टाइम्स’ला माहिती दिली. या प्रकरणामधील एफआयआरमध्ये बलात्कार आणि हत्येच्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अन्य आरोपींनाही अटक करण्यात येणार आहे. 4 मे रोजी शूट करण्यात आलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये कुकी समुदायाच्या 2 महिलांची नग्नावस्थेत धिंड करण्यात आली. या महिलांचे शारीरिक शोषण करण्यात आले. हा सर्व हिंसाचार घडला तेव्हा 800 ते 1 हजार लोकांची गर्दी घटनास्थळी होती. बी फीनोमा गावामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट दिसून येत आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, 5 जणांचं एक कुटुंब हल्ला करणाऱ्या जमावापासून स्वत:ला वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धावू लागलं. संपूर्ण गावावर जवळपास 1 हजार लोकांनी हल्ला केला. लूटमार आणि घरांना आग लावण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या कुटुंबाला वाचवलं. पोलीस या पीडितांना सुरक्षित स्थानावर घेऊन जात असतानाच जमावाने पोलिसांच्या तावडीतून या लोकांना आपल्या ताब्यात घेतलं. ज्या लोकांना पोलिसांकडून जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले, त्यामध्येच या 2 पीडित महिला होत्या.