- विद्यार्थ्यांना जागेवर दाखले, शेतकऱ्यांना शास्रज्ञाचे मार्गदर्शन;आरोग्य तपासणीही
** एनजीएन न्यूज नेटवर्क
चांदोरी : नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा गावपातळीवर सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत चांदोरी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले असून नागरिकांना अनेक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिरात महसूल विभागाच्या विविध सेवा देण्यासोबतच शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले होते. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीनेही जनजागृतीपर स्टॉल लावण्यात आला होता. नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध कामांसाठी अर्ज सादर केले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा देण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, रहिवासी आदी आवश्यक दाखले जागेवरच देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयाची धावपळ टळली आणि त्यांना मोठा दिलासा मिळाला. शेतकरी वर्गासाठीही या शिबिरात विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. भारत मालुंजकर आणि डॉ. निलेश मगर यांनी शेतकऱ्यांना गहू पिकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. उत्पादन वाढीसाठी योग्य बियाणे, रोग व्यवस्थापन आणि पीक पद्धती याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
याशिवाय आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली व आवश्यक मार्गदर्शनही मिळवले. त्यामुळे महसूल शिबिरासोबत आरोग्यसेवेचा लाभही नागरिकांना मिळाला.
यावेळी बोलताना डॉ. शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी निफाड यांनी सांगितले की, “महसूल सेवा गावपातळीवर देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. नागरिकांना कार्यालयीन दगदग टाळून त्यांच्या गावातच सेवा मिळाव्यात यासाठी हे अभियान राबविले जात आहे. अशा शिबिरांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होतो.”
तसेच विशाल नाईकवाडे, तहसीलदार निफाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महसूल विभागाच्या सेवांसोबत इतर विभागांचेही मार्गदर्शन नागरिकांना मिळावे यासाठी हे शिबिर बहुआयामी पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा.
या प्रसंगी डॉ शशिकांत मंगरुळे, विशाल नाईकवाडे,डॉ निलेश मगर,डॉ भारत मालुंजकर, संजय गायखे,सिद्धार्थ वनारसे,विनायक खरात,पुष्कर बाबा हिंगणे,संदीप टर्ले,संदीप गडाख,मंडळाधिकारी जयंत लिलके आदिसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, सूत्रसंचालन मधुकर टर्ले यांनी केले.
महिला दिनानिमित्त विशेष सन्मान….
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रगतशील महिला शेतकरी सौ. सुषमा तुषार खरात यांना देण्यात आले. ग्रामीण भागात शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमात त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
Comments are closed.