सिन्नर/एनजीएन नेटवर्क
मेहनत आणि जिद्दीला कुटूंबियांची साथ मिळाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील पहिली महिला बस चालक होण्याचा मान महिरावणीच्या माधवी साळवे यांना मिळाला आहे. नुकत्याच त्या सिन्नर आगारात सेवा बजावण्यासाठी रुजू झाल्या.
नाशिक विभागाकडून १२ महिला प्रशिक्षणार्थींनी ३०० अधिक सेवापूर्व ८० दिवसांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले. विशेष म्हणजे प्रशिक्षण कालावधीत त्यांना कुठलेही वेतन अथवा प्रशिक्षण भत्ता दिला गेला नाही. आर्थिक अडथळ्यांची शर्यत पार करुन या महिलांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले. महामंडळाने नुकताच वर्धापन दिन साजरा केला. यावेळी चालकपदाची धुरा महिलांच्या हाती देण्यात आली. प्रवासी वाहतूक करण्याची संधी मूळ त्र्यंबक तालुक्यातील महिरावणीच्या माधवी साळवे यांना मिळाली.
@ आपणास वाहन चालविण्याची आवड होती. त्यामुळे प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय पक्का केल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. या माध्यमातून कुटूंबाला आर्थिक हातभार लागणार असल्याचे समाधान अधिक आहे.
- माधवी साळवे