स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक : नाशिकमध्ये महायुतीची वातावरणनिर्मिती, ‘मविआ’ गोंधळलेल्या स्थितीत
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखांबाबत अनिश्चिता असली तरी न्यायालयीन निर्देशाच्या अधीन राहून त्या येत्या तीन महिन्यांत घेणे प्रशासनाला अनिवार्य ठरणार आहे. ही बाब लक्षात घेवून राजकीय पक्षांनी आडाखे बांधायला प्रारंभ केला आहे. नाशिक जिल्ह्यापुरते चित्र विचारात घेता सत्ताधारी महायुती वरकरणी प्रबळ वाटते आहे, तर विरोधकांच्या तंबूत शांतता आहे. ही निवडणूक महायुती सत्तेसाठी तर विरोधी महाविकास आघाडी ( मविआ ) अस्तित्वासाठी लढा देण्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यताच अधिक वाटत आहे.
नाशिक जिल्ह्यात कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. नाशिक शहरात भाजप आणि शिन्देसेना यांचे तर ग्रामीण भागात राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, भाजप आणि शिंदेसेना असा वर्चस्वाचा उतरता क्रम आहे, ‘मविआ’ च्या तुलनेत महायुतीत अजून तरी समन्वय आणि निवडणूक उत्साह दिसून येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी एकदा नाशकात स्वतंत्र मेळावे घेवून निवडणूक वातावरणनिर्मिती केली आहे. अजित पवारांच्या पक्षाकडून अजून तरी राज्यस्तरीय मोठा नेता शहर वा ग्रामीण भागात आलेला नाही. तुलनेत ‘मविआ’ गोंधळलेल्या स्थितीत दिसते आहे. शिवसेना उबाठा पक्ष राज्यस्तरावर मनसेसोबत युती जाहीर करण्याच्या उंबरठ्यावर आहे. या दोन्ही पक्षांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि कॉंग्रेस ‘थांबा आणि वाट पाहा’ च्या भूमिकेत आहेत. मनसेला सोबत घेण्यास किमान कॉंग्रेस नाखूष असल्याचे सध्याचे चित्र आहे. अशा स्थितीत विरोधकांतील फाटाफूट महायुतीच्या पथ्यावर पाडू शकते.
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणूक लढवू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या संख्या लक्षणीय असणार हे निश्चित आहे. सत्ताधारी महायुतीला उमेदवारी देताना अधिक कसरत करावी लागेल. एका प्रभाग किंवा गट-गणांत किमान चार ते पाच प्रबळ इच्छुक असल्याने बंडखोरी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. महायुतीतील प्रदेश नेत्यांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ काढला तर जिल्ह्यात सर्व ठिकाणी सोबत निवडणुका लढल्या जाणे अशक्य वाटत आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. निकालानंतर एकत्र येण्यावर मात्र तीनही पक्षांचे एकमत आहे. दुसरीकडे विखुरलेल्या मविआ मध्ये स्मशानशांतता दिसून येत आहे. शिवसेना उबाठा -मनसे यांच्यातील निर्णयानंतर मविआ टिकते कि विभाजित होते, यावर शिक्कामोर्तब होईल. थोडक्यात, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्यात महायुती सत्तेसाठी तर विरोधी मविआ अस्तित्वासाठी लढा देईल, असे चित्र आहे.
नाशकात भाजप-शिंदेसेनेत द्वंद्व ?
गेल्यावेळी नाशिक महापालिकेत एकहाती सत्ताप्राप्त करणाऱ्या भाजपला यावेळी ‘शंभर प्लस’ चा उंबरठा ओलांडायचा आहे. यावरून त्यांनी स्वबळ निश्चित केल्याचे मानले जात आहे. एकत्रित शिवसेनेतील बहुसंख्य नगरसेवक आणि बिनीचे पदाधिकारी शिन्देसेनेत गेल्याने या पक्षाचे हौसलेही बुलंद आहेत. तुलनेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची नाशिक शहरातील ताकद नगण्य आहे. शिवसेना उबाठा गटाला आलेल्या मर्यादा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांची विकलांगता हे घटक लक्षात घेता नाशिक महापालिकेसाठी भाजप-शिंदेसेनेत द्वंद्व होण्याची शक्यता गडद आहे. जिल्हा परिषद वा ग्रामीण क्षेत्रातील निवडणुकांत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रमुख लढती होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
Comments are closed.