- भुजबळ-कोकाटे यांच्यासह आ. कांदे-आहेर यांनी गड राखले
- आ. बोरसे-बनकर यांना धक्का; भगूरमध्ये २५ वर्षांनतर सत्तापालट
- महाविकास आघाडीचा सुपडासाफ
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. अपेक्षेनुसार, राज्यात सत्तेमध्ये असलेल्या महायुतीने जिल्ह्यात सार्वत्रिक विजयाचा ठसा उमटवत विजयी घोडदौड केली. जिल्ह्यात ११ ठिकाणी जाहीर झालेल्या थेट नगराध्यक्षपद निकालामध्ये शिवसेनेला ५ तर भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी ३ जागी विजय प्राप्त झाला. येवल्यात मंत्री छगन भुजबळ तर सिन्नरमध्ये माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपापले गड शाबूत ठेवले. नांदगाव आणि मनमाड येथे शिवसेना आ. सुहास कांदे तर चांदवडमध्ये भाजप आ. डॉ. राहुल आहेर यांचे उमेदवार विजयी झाले. सटाण्यात मात्र भाजप आ. दिलीप बोरसे यांचा उमेदवार पराभूत होवून तिथे शिवसेना उमेदवाराने बाजी मारली. प्रतिष्ठेच्या पिंपळगाव बसवंत नगर पंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. दिलीप बनकर यांना जबर धक्का बसून तिथे भाजप उमेदवाराने विजयाचा गुलाल उधळला. ओझरला भाजप, भगूरला राष्ट्रवादी कॉंग्रेस तर त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत शिवसेना उमेदवार विजयी ठरले. विरोधी महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडासाफ झाला.
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आणि नगरपंचायातींच्या निवडणुकीसाठी दि. २ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी एकूण ५३ तर नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. सत्ताधारी महायुतीमधील तीनही पक्ष जवळपास स्वतंत्र लढले, तर विरोधी महाविकास आघाडीतील गोंधळ अखेरपर्यंत सुरु राहिला. अखेर रविवारी निवडणूक निकाल जाहीर झाला. थेट नगराध्यक्षपद निकालामध्ये भाजपला ओझर, पिंपळगाव बसवंत आणि चांदवड येथे विजय मिळाला. शिवसेनेला त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, मनमाड, नांदगाव आणि सटाणा येथील नागरिकांनी कौल दिला, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस येवला, भगूर आणि सिन्नर येथे अजिंक्य ठरली.
प्रचारसभांचा धुरळा ..
या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी सभा घेत धुरळा उडवून दिला होता. तुलनेत महाविकास आघाडीच्या कोणत्याही बड्या नेत्यांच्या सभा झाल्या नसल्याने त्यांनी निवडणुकीबाबत गांभीर्य दाखवले नसल्याचे मानले जात आहे.
विजयी उमेदवार असे..
भगूर – राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
पिंपळगाव बसवंत – डॉ. मनोज बर्डे ( भाजप )
सिन्नर – विट्ठलराजे उगले ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
ओझर – अनिता घेगडमल ( भाजप )
त्र्यंबकेश्वर – त्रिवेणी तुंगार (शिवसेना )
इगतपुरी – शालिनी खताळे ( शिवसेना )
येवला – रुपेश लोणारी ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
मनमाड – योगेश पाटील (शिवसेना )
नांदगाव – सागर हिरे (शिवसेना )
सटाणा – हर्षदा पाटील ( शिवसेना )
चांदवड – वैभव बागुल ( भाजप )
Comments are closed.