मुंबई/एनजीएन नेटवर्क
स्वैच्छिक रक्तदान क्षेत्रात महाराष्ट्र जवळपास दशकभराहून अधिककाळ देशात सर्वप्रथम राहिले आहे. महाराष्ट्राच्या आसपासही स्वैच्छिक रक्तसंकलन देशातील कोणतेही राज्य करू शकलेले नाही तर महाराष्ट्रात मुंबई कायमच अग्रेसर ठरली आहे.
करोनाच्या दोन वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये महाराष्ट्राने ५० लाखाहून अधिक रक्ताच्या पिशव्यांचे संकलन केले असून एकूण जमा झालेल्या रक्तापैकी ९९ टक्के रक्तदान हे स्वैच्छिक रक्तदानाद्वारे जमा झाले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगाल दुसऱ्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावर गुजरातचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात करोनाकाळात मुंबईने सर्वाधिक रक्तदान शिबीरांचे आयोजन करून सर्वाधिक रक्तसंकलन केले होते.
देशभरात २०२१ मध्ये सुमारे ८५ हजार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन सुमारे सव्वा कोटी रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्राने २८,९२६ रक्तदान शिबीरांचे आयोजन केले असून १६ लाख ७३ हजार ९४७ रक्ताच्या पिशव्या गोळा केल्या आहेत. याकाळात जमा करण्यात आलेल्या एकूण रक्तापैकी केवळ ०.१५ टक्के रक्त हे बदली रक्तदानाद्वारे घेण्यात आले असून स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण हे ९९.१० टक्के एवढे असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.