NGN News
Latest Marathi News

कुंभमेळा मंत्री समितीत महाजन, भुजबळ, भुसे, कोकाटे यांचा समावेश

  • कुंभ प्राधिकरणानंतर मंत्री आणि शिखर समित्या स्थापन
  • विकासकामांना गती मिळण्याची शक्यता गडद

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री समिती आणि शिखर समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिखर समितीचे अध्यक्ष राहतील तर जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या मंत्री समितीमध्ये जिल्ह्यातील छगन भुजबळ, दादाजी भुसे आणि माणिकराव कोकाटे या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. कुंभमेळा प्राधिकरणानंतर आता या नव्या समित्या अस्तित्वात आल्याने विकासकामांना गती मिळण्याची शक्यता गडद झाली आहे.

अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या लोकोत्सवाबाबत निर्णयांचा धडाका लावण्यात आला असला प्रत्यक्षात कामे सुरु होणे प्रतीक्षेतच आहेत. महायुतीमधील मंत्री स्वतंत्र बैठका घेत असल्याने अधिकाऱ्यांचीही वैचारिक कोंडी होत असल्याचे दिसून आले. मंत्र्यांमधील सुंदोपसुंदी, कामाची कंत्राटे आणि तत्सम मुद्द्यांवरून विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिल्याप्रमाणे झाले होते. याच अनुषंगाने मंत्री समितीची स्थापना करण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. या समितीत जिल्ह्यातील तीन मंत्र्यांशिवाय उदय सामंत, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार रावल या मंत्र्यांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.

शिखर समिती अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे..

दरम्यान, राज्य सरकारने स्थापन केलेल्या दुसऱ्या शिखर समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहाल करण्यात आले आहे. या समितीत अनेक मंत्री सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. शिवाय विविध विभागांचे सचिव आणि अधिकारी कार्यकारी समितीत राहून निर्णयांची अंमलबजावणी करतील.

Comments are closed.