मालेगाव/एनजीएन नेटवर्क
कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याच्या निषेधार्थ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कांदे फेकून देत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. तालुक्यातील मुंगसे उपबाजार समिती समोर हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
रस्त्यावर कांद्याने भरलेले वाहने उभे करुन त्यामधील कांदे रस्त्यावर फेकण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त करीत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. अतिवृष्टी, गारपीट आणि सुलतानी संकट यामधून कसाबसा बाहेर पडणारा शेतकरी कांद्याला भाव नसल्याने पुन्हा हतबल झाला आहे. त्याचीच प्रतिक्रिया आज उमटली.