नाशिक/एनजीएन नेटवर्क
किरकोळ वादातून प्रियकाराने प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे. हाेलाराम काॅलनीतील कस्तुरबा नगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. आरती श्याम पवार असे मृत प्रेयसीचे नाव आहे. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित प्रियकर श्याम अशाेक पवार याला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरती हिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला हाेता. काैटुंबिक कारणातून तिचा पती तिला साेडून दुसरीकडे रहायला गेला. याच कालावधीत तिची ओळख श्याम पवार याच्याशी झाली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ती मुलांसह श्यामसाेबत लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत हाेती. दरम्यान, आरती व श्यामचे काहीना काही कारणातून खटके उडत हाेते. त्यातच मंगळवारी रात्री नऊ वाजता श्याम याने कस्तुरबा नगरातील घरी असताना तिच्या मुलाला चापट मारली. त्यातून आरतीने श्यामला विचारणा केली असता दाेघांत भांडणे झाली. त्याचवेळी संतापाच्या भरात श्यामने किचनमधील धारदार सुरी तिच्या पाठीत खुपसली. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारासाठी दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. यावर प्रियकराने पोलिसांना खरी माहिती दिली नाही. जिल्हा रुग्णालयात यांनी शवचिकित्सा केली असता आरतीच्या पाठीत एक छाेटी जखमी दिसली. त्यामुळे तिचा मृत्यू नैसर्गिक नसून खून केल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. त्यानुसार प्रियकर अशोकला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केल्यानंतर त्याने पोलीस तपासात खून केल्याची कबुली दिली.